आमगाव (गोंदिया) : तालुक्यातील आमगाव-शिवणी नाल्याला आलेल्या पुरातून टाटा सुमो काढताना चालकाचे संतुलन बिघडल्याने टाटा सुमो नाल्यात वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.१०) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या माजी सैनिकाचा मृतदेह तब्बल ३६ तासानंतर शुक्रवारी (दि.१२) सकाळी नाल्यापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. मोहन भरतराम शेंडे (४५) असे नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील मोहन शेंडे (४५), रवी कोंडू महारवाडे (३५) व रोहित भोरे (२३) हे तीन जण बुधवारी शिवणी येथे तेरावीच्या कार्यक्रमासाठी आमगाववरून शिवणी गावाकडे येत होते. दरम्यान गावाजवळील नाल्याला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. मोहन शेंडे याने याने गाडी पुलावरून नेली. पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सुमो वाहून गेली. दरम्यान दोन युवकांनी गाडीतून उडी घेत स्वतःचा जीव वाचविला; परंतु चालक मोहन शेंडे हा गाडीतच अडकून वाहून गेला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन युवकांनी या घटनेची माहिती कुटुंबीय व पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस विभागाने घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी (दि.११) सकाळी सुमो गाडीचा शोध लागला; परंतु वाहून गेलेला माजी सैनिक मोहन शेंडे याचा शोध लागला नव्हता.
दरम्यान शुक्रवारी सकाळी शोध व बचाव पथकाने या नाल्यात शोध मोहीम राबविली. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आमगाव-शिवनी नाल्यात घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर मोहन शेंडे याचा मृतदेह सापडला. पथकाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर आमगाव पोलिसांनी पंचनामा केला. आमगावचे ठाणेदार युवराज हांडे घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे पदमपूर येथे हळहळ व्यक्त होत आहे.