गोंदिया : गोरगरिबांच्या मुलांना खासगी नामवंत शाळेत २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला. या कायद्यांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश देऊन त्याचा खर्च शासन सांभाळत आहे. जिल्ह्याने आरटीई अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशात राज्यात आजघडीला सर्वाधिक प्रवेश करवून पहिल्या क्रमांकावर आपले नाव आणले आहे. जिल्ह्यातील ६७७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या अंतर्गत प्रवेश घेतला आहे.
पालकांची आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देण्याची इच्छा असतानाही ते आर्थिक स्थितीमुळे आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. अशात कित्येकदा आपल्या मुलाला ते शाळेतून ही काढून घेतात. मात्र एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने शिक्षणाचा सक्तीचा अधिकार आणला आहे. त्यातच आता गरिबांच्या मुलांना खासगी नामवंत शाळेत शिकविता यावे यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशाची सोय करून दिली आहे. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित केल्या जातात.
त्यानुसार, जिल्ह्यातील १४७ शाळांची आरटीई अंतर्गत नोंद असून या शाळांमधील ८७९ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे होते. यापैकी पहिल्या सोडतमध्ये ८५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यापैकी ६७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आरटीईच्या प्रवेशात ७७.२ टक्के विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले असून यामुळे गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची टक्केवारी ७६.९९ टक्के आहे.