सालेकसा (गोंदिया) : सालेकसा-दरेकसा राज्य महामार्गावर हाजरा फाॅलजवळील पहाडावरील घाटात दोन ट्रक समोरासमोर येऊन आडवे झाल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक गुरुवारी सकाळपासूनच पूर्णपणे खोळंबली होती. परिणामी या मार्गावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी वेळेत पोहचू शकले नाहीत. वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला १ किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. पण, याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
आमगाव-सालेकसा-दरेकसा राज्य महामार्ग सालेकसा तालुक्यातील लोकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. पुढे छत्तीसगड राज्याला जोडला असल्यामुळे या मार्गावरून महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील लोकांचे दिवसभर येणे-जाणे सुरू असते. याशिवाय दरेकसा भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून शिक्षण घेण्यासाठी दररोज प्रवास करतात. तर, दरेकसा भागात कर्तव्य बजावणारे अनेक कर्मचारी दररोज या मार्गावरून येणे-जाणे करतात. परिसरातील नागरिक व इतर प्रवासी सतत प्रवास करीत असल्यामुळे या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची रेलचेल असते. परंतु या मार्गावर अनेक ओव्हरलोड व मोठे ट्रक नेहमी ये-जा करीत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
प्रवाशांना मनस्ताप, पण दखल घेणार कोण?
दरेकसाजवळील पर्वतरांगेच्या घाटावर वाहन चढवणे किंवा उतरविणे फारच कठीण जात असते. एवढ्यात विरुद्ध दिशेने दुसरे वाहन आले की घाट चढत असलेला ट्रक भर रस्त्यावर अडकून जातो आणि दोन्ही वाहने आडवी होऊन जातात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था दोन्ही बाजूने बंद होत होत असते. अशा घटना मागील काही वर्षांपासून सतत होत असल्या तरी संबंधित विभाग याकडे लक्ष देताना दिसत नाही. एखादे जड वाहन आडवे आले की दरेकसा येथील ट्रॅक्टर चालकांना बोलावून त्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहन खेचण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हा प्रयोगसुद्धा अनेक वेळा फसतो. एकाच वेळी दोन-तीन ट्रॅक्टर बोलावून ट्रक बाहेर काढला जातो. परंतु यासाठी चार ते पाच तास लागतात. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
गुरुवारी (दि. १३) येथील तीव्र उतार असलेल्या घाटावर दोन जड वाहने समोरासमोर आडवी आल्याने सकाळपासून दिवसभर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शाळेत पोहोचू शकले नाहीत, तर शिक्षक आणि इतर कर्मचारीसुद्धा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत.
टोल वाचविण्यासाठी अशीही धडपड
राष्ट्रीय महामार्गावरून चालणारे १८ चाकी ते ४० चाकापर्यंतचे मोठे ट्रकसुद्धा अनेकवेळा या मार्गावरून येणे-जाणे करीत असतात. राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर लागणारा टोल चुकविण्यासाठी किंवा इतर फायद्यासाठी ट्रकचालक या छोट्या राज्य महामार्गावरून आपली जड वाहने नेतात.
कायमस्वरूपी तोडगा काढा
सालेकसा-दरेकसा राज्य महामार्गावर हाजरा फाॅलजवळील पहाडावरील घाटात ट्रक समोरासमोर येऊन आडवे होणे ही नित्याची घटना झाली आहे. यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. परिणामी वाहनचालक आणि परिसरातील गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.