लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे कुणी कितीही या जागेवर दावा करीत असेल, तरी हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे कुणी काय बोलते याकडे फारसे लक्ष देऊ नका, जोमाने कामाला लागा, असा सूर गोंदिया येथे शुक्रवारी (दि. १३) आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आळवला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक सर्कस ग्राऊंडवर काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, सुनील केदार, नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा. डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. नामदेव किरसान, श्यामकुमार बर्वे, मधू भगत, आ. सहषराम कोरोटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड व काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आता काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून, ही विजय रथाची सुरुवात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिलीप बन्सोड मांडले. सूत्रसंचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले.
पटोलेंचा पटेलांवर निशाणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या जिल्ह्याचा सत्यानाश केल्याचा आरोप त्यांनी केला. आता भाजपाशी हातमिळवणी करून ते जिल्ह्याचे वाटोळे करीत आहे. मात्र, त्यांनी आता आमच्या भानगडीत पडू नये, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
"महायुती सरकारमधील ईजा, बिजा आणि तिजाचे चेहरे लोकसभेनंतर पडले आहेत. ५६ इंचांची छाती ३२ इंचांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पारचे स्वप्न भंग झाल्यानेच लाडकी बहीण योजना आणली. राज्याला उद्ध्वस्त करण्याचे काम विद्यमान महायुती सरकार करीत आहे. जर्मनी मध्ये नोकरीची संधी" - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते
"तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिन्यांत कोसळले होते. तशीच स्थिती पुन्हा मोदी सरकारची होणार आहे. विधानसभा निवडणुकानंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मोदी सरकारची साथ सोडतील अन् हे सरकार कोसळेल. भाजपाच्या अधःपतनाला सुरुवात झाली असून, माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी योग्य वेळी निर्णय घेतला आहे." - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.
"पाच वर्षापूर्वी विकासाच्या नावावर मी भाजपात प्रवेश केला होता. तो माझा केवळ भ्रम होता. माझ्या या निर्णयामुळे तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते दुखावले होते. मी मनापासून या सर्वांची क्षमा मागतो. माझा हा पक्ष प्रवेश नसून घरवापसी आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची आता मी व्याजासह परतफेड करणार आहे."- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार