लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या गोंदिया पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि.६) आ. विनोद अग्रवाल यांच्या जनता की पार्टी (चाबी) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. सभापतीपदी चाबीचे तुमखेडा गणाचे मुनेश रहांगडाले तर उपसभापतीपदी धापेवाडा गणाचे निरज उपवंशी यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत चाबी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याचे चाबीने घड्याळाचे काटे फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. गोंदिया पंचायत समितीत एकूण २८ सदस्य असून जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती आहे. यात १० सदस्य चाबीचे, १० सदस्य भाजपचे, ५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, अपक्ष २ आणि बसपाचा १ सदस्य निवडून आले होते. पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी १५ हा आकडा पार करण्याची गरज होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. भाजप नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत चाबी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी युतीसाठी चर्चा केल्याची माहिती आहे; मात्र त्यांच्या चर्चेला यश आले आहे. येथील सभापतीपदाच्या निवडणुकीला घेऊन एका जिल्हा बँकेच्या संचालकाने बरेच हातपाय मारले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आ. विनाेद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेसह जात राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. चाबी संघटनेचा सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपसभापती हा फाॅर्म्युला ठरला. सभापतीपदासाठी चाबीचे मुनेश रहांगडाले यांनी तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निरज उपवंशी यांनी अर्ज दाखल केला. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत मुनेश रहांगडाले आणि निरज उपवंशी यांना प्रत्येकी १८ मते मिळाली. दोन अपक्ष आणि बसपाच्या एका सदस्याने सुद्धा चाबी आणि राष्ट्रवादीला समर्थन दिले. त्यामुळे भाजपला या पंचायत समितीत १० सदस्य असून सुद्धा सत्तेपासून दूर रहावे लागले. सभापती आणि उपसभापतीची निवड झाल्यानंतर त्यांचे आ. विनोद अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची ढोलताशांच्या गजरात विजयी रॅली काढण्यात आली.
मनमर्जीने नव्हे जनतेच्या मनाने चालणार कारभार : विनोद अग्रवाल - गोंदिया पंचायत समितीत आजवर केवळ मर्जीने घरून कारभार चालविला जात होता; पण आता हा सर्व प्रकार चालणार नसून जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या मर्जीने कारभार चालणार आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. विकासाच्या मुद्यावर एकत्र : राजेंद्र जैन - गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, विकास कामांना अधिक गती मिळावी व जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत याच हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसने चाबीसह एकत्र येत गोंदिया पंचायत समितीत सत्ता स्थापन केली. यामुळे विकासाची एक नवीन नांदी सुरू होईल.