गोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० अशा एकूण ३० जागांसाठी आज (दि. १८) एकूण ४७६ मतदान केंद्रांवरून मतदान पार पडत आहे. ३० जागांसाठी एकूण १३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यासाठी ३ लाख ३३७१ मतदार मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत ११.५८ टक्के मतदान पार पडले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० अशा एकूण ३० जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. २९ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आता आज या जागांसाठी मतदान आणि बुधवारी सर्वच जागांची एकत्रित मतमोजणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ५१ तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने ४७६ मतदान केंद्र निश्चित केेले आहे.
सर्वाधिक मतदान केंद्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद क्षेत्र आणि २ पंचायत समिती गणासाठी एकूण ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासाठी १३४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून एकूण ८२ हजार १०१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
मतमोजणी बुधवारी
जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर, २१ डिसेंबरला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील जागा आणि दुसऱ्या टप्प्यातील जागांची एकत्रित मतमोजणी बुधवारी (दि. १९) प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने मतमोजणीसाठी व्यवस्था केली आहे. मजमोजणीनंतरच मतदारांचा कल कळेल.