गोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. मात्र आता मतदारांनी नेमका कोणत्या उमेदवाराला कौल दिला याच्या निकालासाठी १९ जानेवारी म्हणजे तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या जागा वगळून मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गाच्या जागा खुल्या करुन त्या ३० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक घेण्यात येणार आहे. यानंतर सर्वांची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला करण्यात येईल. तोपर्यंत उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल काय लागणार याचा उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना महिनाभर घोर राहणार आहे.
ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबल्याने उमेदवारांना प्रचारासाठी फारच कमी कालावधी मिळाला. तरी या कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार आणि नेत्यांनी केला. पण यात कोण यशस्वी होतो हे मात्र १९ जानेवारीच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या जागांवर ठरणार सत्तेचे समीकरण
ओबीसी प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण करुन या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. यात जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागांचा समावेश आहे. या ३० जागा महत्त्वपूर्ण असून यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे या जागा आपल्या पदरात पडाव्या यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचा भर आहे. त्यामुळे १८ जानेवारीची निवडणूक अधिक चुरसपूर्ण होण्याची शक्यता आहे.
प्रचारासाठी मिळणार भरपूर कालावधी
ओबीसी जागा सर्वसाधारण करण्यात आल्या असल्या तरी या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्याचा निश्चय सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. त्यासाठी जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार देखील निश्चित झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांना प्रचारासाठी किमान महिनाभराचा कालावधी मिळणार आहे.
कोणते क्षेत्र होणार महिलांसाठी राखीव
ओबीसी जागा आता सर्वसाधारण करण्यात आल्या असून यात काही जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. यासाठी २३ डिसेंबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीनंतरच कोणते क्षेत्र महिलांसाठी राखीव आहे हे कळेल.