गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली असून, दरराेज दीडशे कोरोना बाधितांची नोंद होत आहे. संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाणसुध्दा वाढविण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात दररोज १८००, तर १० खासगी प्रयोगशाळांमध्ये ३०० चाचण्या केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट करण्यासाठी कुठलेच शुल्क लागत नसून, खासगी रुग्णालयात चाचण्यांसाठी ५०० ते ७५० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. गोंदिया शहरातील १० खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचण्या करण्याची परवानगी आरोग्य विभागाने दिली आहे. यानुसार या प्रयोगशाळांमध्ये दररोज ३०० चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांसाठी गोंदियाकरांना दररोज २ लाख १० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. बरेच नागरिक शासकीय रुग्णालयात न जाता खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन कोरोना चाचणी करतात. त्यामुळे यासाठी त्यांना शुल्क भरावे लागते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असल्याचे खासगी प्रयोगशाळा संचालकांनी सांगितले.
..............
कोरोना चाचणीसाठी ५०० ते ७५० रुपयांचा खर्च
- शासनाने नुकतेच आरटीपीसीआर चाचण्यासाठी ५०० रुपये आणि अँटिजेन टेस्टसाठी १५० रुपयांचे दर निश्चित करुन दिले आहेत. मात्र, बऱ्याच खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ७५० रुपये घेतले जात असल्याची माहिती आहे.
- खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचण्यांसाठी शासकीय दरापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीसुध्दा आहेत. पण, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.
.....
आठवडाभरात १६,५०० चाचण्या
- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात दररोज १८०० आणि खासगी प्रयोगशाळेत ३०० चाचण्या केल्या जात आहेत. मागील आठवडाभरात एकूण १६,८०० चाचण्या करण्यात आल्या.
- कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागाने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. त्यामुळे चाचण्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
- खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांची माहिती वेळीच आरोग्य विभागाला पोहोचवली जात नसल्याने उपाययोजना करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.
............
जिल्ह्यात दररोज २१०० चाचण्या
राेजच्या चाचण्यांची संख्या
शासकीय प्रयोगशाळा : १८००
खासगी प्रयोगशाळा : ३००
..........
शासकीय प्रयोगशाळा : १
खासगी प्रयोगशाळा : १०