गोंदिया : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.एस. इनामदार यांचा पदभार काढून सहायक गटविकास अधिकारी (पंचायत विभाग) पी.डी. निर्वाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बीडीओ इनामदार यांनी १८ जानेवारी रोजी प्रकृती बरी नसल्याचे कारण दाखवून २२ जानेवारीपर्यंत ते रजेवर होते. परंतु ते कोणतीही सूचना न देता सतत गैरहजर होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक गटविकास अधिकारी डी.एम. खोटेले यांच्याकडे सोपविला. ३ फेब्रुवारी रोजी अचानक इनामदार यांनी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता व परवानगी न घेता परस्पर गटविकास अधिकारी पदाचा प्रभार खोटेले यांच्याकडून स्वीकारला. याबाबत इनामदार यांना खुलासा मागविला असतानाही त्यांनी खुलासा दिला नाही. त्यांनी काटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याचे पुढे आले.
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण सोडून काटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आले. यासंदर्भात तेथील डॉक्टरांना विचारणा केल्यावर बीडीओ यांनी आपल्या पदाचा दुरूुपयोग करून वैद्यकीय प्रमाणपत्र मागिवल्याचे पुढे आले. बीडीओ इनामदार हे सद्य:स्थितीत वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात गटविकास अधिकारी या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार सहायक गटविकास अधिकारी निर्वाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.