लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. यापूर्वी राज्यात सर्वात कमी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली होती. तर मागील आठवडाभरापासून विदर्भात गोंदिया जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी आहे. शुक्रवारी (दि.११) गोंदिया येथे १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हाचा पारा अजुनही खालीच असल्याचे चित्र आहे. पारा खाली असल्याने थंडीत वाढ झाली असून त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. दिवसभर हुडहुडी राहत असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. थंडीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे शेतीच्या कामाचे सुध्दा वेळापत्रक बदलले आहे. यंदा थंडीला उशीराने सुरुवात झाल्याने उनी कापड विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र आता थंडी वाढल्याने उनी कपडे विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये सुध्दा गर्दी दिसून येत आहे.