गोंदिया :‘राईस सिटी’ गोंदियात चौथ्या राज्यस्तरिय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्याच्या विविध भागातील अनेक मान्यवर हजेरी लावून व्यसनमुक्तीचा जागर करणार आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात हे संमेलन पहिल्यांदाच होत असल्यामुळे संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुण्याच्या ‘मुक्तांगण’ संस्थेच्या संचालिका मुक्ताताई पुणतांबेकर या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता छत्तीसगड राज्याचे महसूल व उच्च शिक्षणमंत्री प्रेमप्रकाश पांडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रसिध्द गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते व सिने अभिनेत्री निशा परूळेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खा.प्रफुल्ल पटेल, खा.नाना पटोले, आ.प्रा.अनिल सोले, नागो गाणार, राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जि.प.अध्यक्ष उषा मेेंढे, नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे स्वागताध्यक्षाच्या भूमिकेत राहणार आहे. राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश नगरातील स्वागत लॉनमध्ये होत असलेल्या या संमेलनात दि.२२ ला सकाळी ९ ते १०.३० पर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे. १०.३० ते ११ या वेळेत प्रदर्शनाचे उद्घाटन, ११ वाजता मुख्य उद्घाटन सोहळा तर दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. दुपारी २.३० ते ३.३० यावेळेत व्यसनातून मुक्त झालेले आपले अनुभव करतील. दोन दिवसांच्या कार्यक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके आणि समाजकल्याण आयुक्त पियुष सिंह तसेच गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आणि जि.प.सीईओ दिलीप गावडे यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)चर्चासत्र आणि कविसंमेलन४लोकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, आव्हाने व उपचार या विषयावर दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दीपक पाटील, अमोल मडामे, डॉ.सुधीर भावे, डॉ.शैलेंद्र पानगावकर, राहुल भंडारे, तुळसीदास भोईटे हे तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करतील. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रसिध्द साहित्यिक युवराज गंगाराम, अंजनाबाई खुणे, माणिक गेडाम, बापू ईलमकर आणि शारदा बडोले हे सहभागी होतील. ४सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश यावर दिलीप सोळंके, गणेश हलमारे, ज्ञानेश्वर रक्षक, बाळासाहेब लबडे, श्यामसुंदर सुलर आणि प्राचार्य जुल्फी शेख हे आपले विचार व्यक्त करतील. रात्री ८ ते ८.३० या वेळेत कॉमेडी एक्सप्रेस फेम जयवंत भालेकर हे कॉमेडीचा एकपात्री प्रयोग सादर करतील. रात्री ८.३० वाजता कैकाडे महाराजांचे व्यसनमुक्तीवर कीर्तन होईल.व्यसनमुक्ती दिंडी आणि शपथ४संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी स्टेडियमपासून व्यसनमुक्ती ग्रंथदिंडी निघेल. यात गोंदिया शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्टेडियममध्ये सर्व विद्यार्थ्यांना ना.राजकुमार बडोले व्यसनमुक्तीची शपथ देतील. ही दिंडी नेहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी चौक मार्गे स्वागत लॉन या साहित्य संमेलनस्थळी पोहोचेल. या दिंडीत युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.धोरणकर्ते आणि कार्यकर्त्यांचे संमेलन - मुक्ता पुणतांबेकर व्यसनाधिनता ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार, अपघात, आत्महत्या असे अनेक सामाजिक प्रश्न त्यातून निर्माण होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार व्यसनाधिनता हा कॅन्सर व एड्सनंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मृत्युकडे नेणारा गंभीर आजार आहे. हे दोन आजार होण्यासाठी सुध्दा अप्रत्यक्षपणे व्यसन कारणीभूत होऊ शकते. घरातील व्यक्ती जेव्हा व्यसन करत असते, तेव्हा त्या कुटूंबातल्या सर्वांनाच त्याचा त्रास होतो. व्यसनामुळे शारीरिक, मानिसक, कौटूंबिक, आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम होतात. असे असूनही समाजात व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. वाढत्या व्यसनाधिनतेला रोखायचे असेल, तर धोरणात्मक पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच व्यसनमुक्ती ही लोकचळवळ होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करायला हवेत. याच भूमिकेतून महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय आण िविशेष सहाय्य विभागाच्या वतीने दरवर्षी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेण्यात येते. यंदा हे संमेलन गोंदिया जिल्हयात २२ आणि २३ जानेवारी २०१६ या दिवशी होत आहे. आतापर्यंतच्या संमेलनांमुळं या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ञ व्यक्ती यांच्या कामाचं-विचाराचं आदान-प्रदान होण्याची एक चांगली प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या कामाचं चांगलं नेटवर्कीगही साधता आलं. विविध विषयांवरची चर्चासत्रं यामुळं ज्ञान वाढण्याच्या दृष्टीनंही उपयोग झाला. या संमलेनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था पिहल्यांदाच एकत्र आल्या आहेत. या दोन्ही व्यवस्थांचं ‘संम्मीलन’ म्हणजेच व्यसनमुक्ती साहित्य संमेलनं! या एकत्रीकरणातून, या संमेलनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणं ही सरकार आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबरच प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. ही जबाबदारीच अधिक ठळकपणे मांडण्याचं, अधोरेखित करण्याचं काम या संमेलनातून होईल, असे वाटते.
गोंदियात व्यसनमुक्तीचा जागर
By admin | Published: January 22, 2016 2:43 AM