गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सोमवारी (दि.२८) ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये मोठा बिघाड झाल्याने यावरुन चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे करण्यात तक्रार आली होती. दरम्यान यामुळे वादग्रस्त ठरलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश मंगळवारी (दि.२९) धडकले. काळे यांना लोकसभा पोटनिवडणुकीतील ईव्हीएम मधील बिघाड भोवल्याची चर्चा आहे. काळे यांच्या जागेवर नागपूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कांबदरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी (दि.२९) त्वरीत पदभार घेण्याचे आदेश मिळाले. बलकवडे या आदेश मिळताच गोंदिया येथे रूजू होण्यासाठी रवाना झाल्या. दरम्यान बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. भंडारा जिल्हाधिकारी सध्या सुट्टीवर असल्याने ते येईपर्यंत भंडारा येथील प्रभार व निवडणूक निर्णय अधिकाºयाचा पदभार स्विकारणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बदली झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच बदलीचे स्थान अद्यापही निश्चित झाले नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 6:48 PM