पांढरी : या परिसरातील ग्राम बकिटोला-गोंगले नाल्यातून रेतीचा उपसा करताना वनरक्षक मंदा बिसेन यांनी रविवारी (दि.७) रात्री ट्रॅक्टर पकडले होते. मात्र, त्यावर कारवाई न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावात वनरक्षक व वाळू माफियांची साठगाठ असून, त्यातूनच वाळू उपसा होत असल्याचे नागरिक बोलत आहेत. अशात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. वाहन पकडूनही कारवाया होत नसल्याने रेतीमाफियांचे मनसुबे अधिकच मजबूत होत असून, चोरी सुरूच आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रविवारी रात्री ट्रॅक्टर पकडल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व उपवनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली. आता वनरक्षकावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------
कोट
गोंगले-बकिटोला येथील प्रकरणाबाबत माहिती मिळाली आहे. याप्रकरणी वनरक्षक मंदा बिसेन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
व्ही.बी. प्रधान
वनपाल, कोसमतोंडी