देवरी : राष्ट्रीय महामार्ग म्हटले की, डोळ्यासमोर चकाकणारे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा विजेचे खांब व दुभाजक असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, देवरी-आमगाव हा नवीन राष्ट्रीय महामार्ग या संकल्पनेला पूर्णपणे अपवाद ठरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे. या खड्ड्यांना अच्छे दिन येणार का? असा सवाल नागरिकांकडून खासदार व आमदारांना विचारला जात आहे.
खासदार-आमदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. या महामार्गावर चिखलमय खड्डे निर्माण होऊन त्यामधून दुचाकीस्वार व पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. या गंभीर बाबीकडे देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे खासदार-आमदार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या या मुख्य महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वडेगाव येथील अर्ध्या किलोमीटर वरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस किंवा वाहन चालवताना वाहनधारकांना त्रास होत असून हे खड्डे जीवितास धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. या महामार्गावरील मोठ मोठ्या खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे वाहन चालवताना साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यास वाहनधारक सरळ खड्ड्यात जात असल्याने अपघात घडत आहे.
-------------------------------
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
या खड्ड्यांमुळे नेहमी अपघात घडत असले तरी लोकप्रतिनिधी वा अधिकारी वडेगाव येथील मोठ-मोठे खड्डे पडलेल्या या महामार्गाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. या महामार्गाकडे जातीने लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.