लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया (गोरेगाव) : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रोहिणी बांधकर यांनी डिजिटल हस्ताक्षर प्रमाणपत्र कार्यालयातून गमाविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कम अडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी कामाचे बिल मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या प्रकारामुळे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे सांगीतले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात मनरेगाची कुशल कामे सन २०१७-१८ या वर्षात एक कोटी १३लाख ९६ हजार रुपये व सन १८-१९ या वर्षात दोन कोटी ५९ लाख ७७ हजार रुपयांची करण्यात आली आहे़त. या रक्कमेची मागणी शासनाकडून गटविकास अधिकारी यांनी करावयास पाहिजे होती मात्र या अधिका-यांनी स्वत:चे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र गहाळ केल्याने त्या रक्कमेची मागणी पंचायत समिती प्रशासनास आतापर्यंत करता आली नाही.मनरेगा अंतर्गत शौचालय बांधकाम,गोठा बांधकाम ,सिंचन विहीर बांधकाम, शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या मनरेगा रक्कमेतुन गोरेगाव पंचायत समितीला कामाचे अनुदान निधी चाळीस लाख २३ हजार मंजूर झाल्याची माहिती आहे, मात्र गटविकास अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे ही रक्कम मिळू शकली नाही. यासंदर्भात लेखा अधिकारी उमेश पंधरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की डीएसी चार दिवसापूर्वी हरवली आहे. नवीन डीएसी तयार करण्यात आली आहे. मात्र डीएसी संगणकातील जावा सॉफ्टवेअर स्वीकृत करीत नाही हा एक तांत्रिक दोष आहे. डीएसी स्वीकृत होताच मनरेगा कामाचे अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.या संदर्भातील माहीती आमदार विजय रहांगडाले यांना टेलिफोनवर सांगीतले असता त्यांनी सांगितले की, मनरेगा कुशल कामाची रक्कम दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व कामचुकार करणा-या गट विकास अधिकारी रोहिणी बांधकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगीतले आहे. सरपंच सेवा संघटनचे पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांच्या कामाचा निषेध केला असून बीडीओच्या विरोधात कारवाई करण्यात यावी व कामगारांची रक्कम बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी सरपंच सेवा संघटना गोरेगाव यांनी केली आहे.‘मनरेगाची कामाची रक्कम मंजूर आहे मात्र तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही रक्कम जमा होऊ शकत नाही याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली त्यांनी आयुक्त यांना माहिती दिली आहे, रक्कम कधी जमा होणार याबाबत सांगता येत नाही.’रोहिणी बांधकर, गट विकास अधिकारी गोरेगाव
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव गटविकास अधिकाऱ्यांनी केली ‘डीएसी’ गहाळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:27 PM
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रोहिणी बांधकर यांनी डिजिटल हस्ताक्षर प्रमाणपत्र कार्यालयातून गमाविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कम अडली असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी कामाचे बिल मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या प्रकारामुळे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे सांगीतले जात आहे.
ठळक मुद्देकामचुकार करणा-यावर होणार कारवाई : आमदार विजय रहांगडाले