मोहाडी-चोपा : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गोरेगाव तालुक्यातील चोपा केंद्रातील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी येथील डी.व्ही. टेटे यांच्या प्रयोगाची राज्यस्तरीय प्रयोगासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. अर्जुनी-मोरगाव येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यात जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी व शिक्षक यांच्या तालुकास्तरावरील प्रथम असलेल्या प्रयोगांचा सहभाग होता. गोरेगाव तालुक्यातून बाम्हणी शाळेतील सहायक शिक्षक डिलेश व्ही. टेटे यांच्या शिक्षक गटातून मनोरंजन व प्रायोगीक पध्दतीने गणित शिकणे या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी भेंडारकर, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, चोपा केंद्रातील केंद्रप्रमुख के.एल. कटरे व सर्व शिक्षकवृंद यांनी राज्यस्तरीय सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.(वार्ताहर)
गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 1:42 AM