लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या रब्बी हंगामातील खरेदी केेलेल्या धानाचा मोठ्या प्रमाणात अफहार केल्याचे प्रकरण नुकतेच सालेकसा तालुक्यात उघडकीस आले होते. आता असाच काहीसा प्रकार गोरेगाव तालुक्यातील एका केंद्रांवर घडला असल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या चमूने मंगळवारी (दि.१८) गोरेगाव तालुक्यात जाऊन या केंद्राची चौकशी केल्याची माहिती आहे. रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची आता भरडाईसाठी उचल केली जात आहे. पण आठ दहा केंद्रावर खरेदी केलेला धानच नसल्याची धक्कादायक बाब राईस मिलर्सच्या तक्रारीनंतर पुढे आली. दरम्यान चौकशी सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर ९ हजार क्विंटल धान गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ज्या ज्या धान खरेदी केंद्राकडे धान शिल्लक आहे. त्या सर्व धान खरेदी केंद्राची चौकशी करणे सुरू केले असून गोदामात खरेदी करण्यात आला तेवढा धान शिल्लक आहे किवा नाही याची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गोरेगाव तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास तीन हजार क्विंटल धान गायब असल्याची बाब पुढे येताच मंगळवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या चमूने या केंद्राला भेट देऊन चौकशी केली. त्यात मोठ्या प्रमाणावर धान खराब झाला असल्याची माहिती आहे. तर खराब झालेला धान घेता येत नसल्याने आता या धानाचे काय करणार याचा निर्णय मार्केटिंग फेडरेशन घेणार आहे. तर कमी धान आढळल्याबाबत संबंधित संस्थेला नोटीस सुद्धा बजाविल्याची माहिती आहे. चौकशीत नेमके काय आढळले याबाबत मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. पण या प्रकारामुळे सालेकसानंतर आता गोरेगाव तालुक्याचा नंबर लागणार का अशी चर्चा सुरू आहे.
फेडरेशनच्या कार्यालयात वाढली गर्दी - धान खरेदी प्रकरणातील घोळ प्रकरणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने फौजदारी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्या संस्थाकडे धान कमी आहे त्यांनी आता थेट मार्केटिंग फेडरेशनचे कार्यालय गाठून धानाची पूर्तता करून देण्याचे हमीपत्र भरून देत आहे. तर आमगाव येथील एका प्रतिष्ठित संस्थेने याच कारवाईच्या धसक्याने लाखो रुपये भरल्याची माहिती आहे. ते संस्थाचालक भूमिगतच - सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ ते १६ संचालक अद्यापही गायब असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रत्येक संस्थेची चौकशी - यंदा धान खरेदीतील घोळ पुढे आल्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने प्रत्येक पाऊल जपून टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून आठ दहा अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात आठ दिवसांपासून आले आहे. हे पथक प्रत्येक संस्थेला भेट देऊन खरेदी प्रक्रियेची चौकशी करीत असल्याची माहिती आहे.