गोरेगाव (गोंदिया ) : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील इंदिरा नगर परिसरातील सदासावलीच्या झुडपात शिकार झालेल्या बिबट्याचे दोन पंजे शुक्रवारी (दि. ८) मिळाले. यामुळे पुन्हा खळबळ उडाली असून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांची टोळी हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तिल्ली मोहगाव येथील शेतशिवारात दोन बिबट्यांची शिकार करून त्यांचे अवयव गायब करण्यात आले होते. याच परिसरात एका नीलगायची शिकार करण्यात आली होती. ही घटना पाच दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. गुरुवारी (दि. ७) मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी तिल्ली येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. पीटर श्वानाच्या मदतीने परिसरसुध्दा पिंजून काढला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास वनविभागाने या परिसरात राबविलेल्या शोधमोहिमेत तिल्ली मोहगाव येथील इंदिरा नगर परिसरातील बोडीजवळ सदासावलीच्या झुडपात बिबट्याचे दोन पंजे मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या शिकार घटनांमध्ये वाढ झाली असून शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच दोन बिबट्या आणि एका नीलगायची शिकार याच परिसरात करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे हे प्रकरण स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरसुध्दा शेकण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी या परिसराला भेट देऊन संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली हाेती. तसेच वन अधिकाऱ्यांनासुध्दा फटकारल्याची माहिती आहे. त्यानंतर शुक्रवारी वनविभागाने राबविलेल्या शोधमाेहिमेत याच परिसरापासून काही अंतरावर बिबट्याचे दोन पंजे मिळाले. हे पंजे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील शिकारीसुध्दा हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.