कुमारी मातेचा निर्णय : तंटामुक्त समितीकडे गेले होते प्रकरण नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वत:च्या जेवणाची सोय नसल्याने आपल्या मुलीचे संगोपण कसे करणार या विवंचनेत असलेल्या कुमारी मातेने जन्माला घातलेल्या नवजात मुलीला ठेवण्यास चक्क नकार दिला आहे. अनैतिक संबधातून जन्माला घातलेल्या त्या निष्पाष चिमुकलीला आता नागपूरच्या शिशूगृहात ठेवण्याची पाळी आली आहे. तिरोडा तालुक्याच्या खमारी येथील एका २० वर्षाच्या तरूणीशी गावातील प्रेमसंबध जुळले. ते प्रेमाच्या हाणाभाका देत असताना ती मुलीगी कुमारी माता होणार याची चाहूल लागली. हे कळताच त्या मुलीने आपल्या प्रियकराकडे लग्नाचा अट्टाहास धरला. परंतु ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्या मुलीने आपले लग्न त्या मुलाशी करून द्यावे, अशी मागणी तंटामुक्त गाव समितीला केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रकरणाला हाताळण्यासाठी एक दिवस ठरवून दोघांना बोलावले. परंतु त्या दिवशी आपल्यावर दबाव टाकून लग्न लावतील असा धसका घेत तो तरूण पसार झाला. हे प्रककरण हाताळण्याची संधी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेला मिळालीच नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसात तक्रारही करण्यात आली. यानंतर त्या मुलीने त्या नवजात बाळाला ११ मे रोजी जन्म दिला. अनैतिक संबधातून ते मूल जन्माला आल्याने आपल्या भविष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून त्या कुमारी मातेनेही त्या चिमुकलीचे संगोपण करण्यास नकार दिला. तिरोडाचे पोलीस निरीक्षक यांनी सदर कुमारी माता व तीचे नवजात शिशु यांना बाल कल्याण समिती, गोंदिया यांच्या समोर हजर केले. यावेळी झालेल्या बयानावरून सदर कुमारी मातेला महिला निवासगृह आणि नवजात शिशूला नागपूरच्या शिशूगृहात तात्पुरते दाखल केले आहे. त्या चिमुकलीचे पौर्णिमा असे नाव ठेवण्यात आले. त्या कुमारी मातेच्या घरी बाल कल्याण समितीने भेट देऊन चौकशी केली असता कुमारी मातेच्या पालकांनी त्या कुमारी मातेला व तिच्या चिमुकलीला स्वीकारण्यास नकार दिला. त्या चिमुकलीचे संगोपण कसे करणार म्हणून त्या कुमारी मातेनेही आपल्या मुलीला स्विकारण्यास नकार दिला.बाल कल्याण समितीने सदर कुमारी मातेला तीचे नवजात शिशुला परत घेण्यासाठी ६० दिवसाचा कालावधी दिला आहे. समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे यांनी व इतर सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. ६० दिवस आक्षेपासाठी बाल कल्याण समिती, गोंदिया यांनी दिलेल्या आदेशावर सदर कुमारी मातेच्या नातेवाईकांना याबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनाही ६० दिवसाच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कार्यालय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अंगुर बगीचा रोड गजानन कॉलनी गोंदिया येथे मो. ७७०९६६१०४६, ९४०५९८५३४९ यावर संपर्क साधावा. किंवा प्रत्यक्ष भेट घेण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुहास एस. बोंदरे यांनी केले आहे.
पोटासाठी नाकारला पोटाचाच गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 1:03 AM