गोंदिया : गोवरी, शेणकूळ, शेनवळ या गोबरधन असे विविध नाव असलेले गोबरधन सध्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे इंधन म्हणून आजही याचा उपयोग होत असताना दिसते. पुरातन काळापासून ग्रामीण भागातील महिला शेणाला कालवून शेणकुळ तयार करतात. गरीबांचे इंधन असलेले गोबरधन आता दिसेनासे झाले आहे. याचे मुळ कारण म्हणजे पशुधनात होणारी भारी घट आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे चिंताग्रस्त शेतकरी कवडीमोल भावाने आपले पशुधन बाजारात विकायला नेत असतानाचे चित्र सर्वदूर दिसत आहे. तर काही पशुधनाची रवानगी कत्तलखान्याकडे होताना दिसते. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर पशुधन विकण्याशिवाय कुठलेच साधन दिसत नाही. वाढती महागाई, शिक्षण यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पशुधनात भारी घट झाली आहे. त्यामुळे गोवरी, शेणकुळ, शेणवाड्या, गोबरधन आता कालबाह्य होणार आहे.सध्याच्या विज्ञान युगात गॅसचा स्वयंपाकासाठी वापर करताना बहुसंख्य लोकं दिसतात. मात्र गावखेड्यात बऱ्याच लोकापर्यंत हा गॅस पोहचला नसून ग्रामीण भागात गोबरधनचा उपयोग आजही केला जातो. खेड्यात आजही गोबरधनचे ढिग पाहावयास मिळतात. पण पशुधनात घट झाल्याने ग्रामीण भागातील गरीबांचे इंधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
गोवरी कालबाह्य होण्याच्या मार्गावर
By admin | Published: April 10, 2015 1:28 AM