गोंदिया : शासनाने पूरक पोषण आहारातून मागील काही महिन्यांपासून खाद्यतेल वगळले आहे. त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना धान्य किराणा आदी साहित्य वाटप केले जाते. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी, स्तनदा माता, गरोदर महिला यांचा लाभार्थींमध्ये समावेश आहे. मात्र शासनाने आता काही महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी साखर दिल्याने सकस आहाराला फोडणी कशी द्यायची, असा सवाल लाभार्थी महिला करीत आहेत. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना पूरक सकस आहार मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. कुटुंबाचा संतुलित आहार होत असल्याने ही योजना लोकप्रिय झाली आहे. लॉकडाऊनमुळे तेलाचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारातून खाद्यतेल कमी करण्यात आले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आदिवासी व नागरी भागातील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुले, कुपोषित बालकांना पूरक पोषण आहार पॅकिंग करून दिला जातो, मात्र काही महिन्यांपासून तेलाचा पुरवठा बंद करून साखर वाटप केली जात आहे. हा बदल करताना प्राथमिक कॅलरीज तेवढ्याच प्रमाणात मिळत असल्या तरी आहाराला फोडणीच दिली जात नाही.
.......................
एकूण लाभार्थी-१,०९,०६५
सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी- ४१,४७०
तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थी- ५०,८१३
गरोदर महिला- ८१०३
स्तनदा माता- ८६७९
...................
-काय काय मिळते-
१)सुधारित पाककृतीत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थींना चवळी अथवा हरभरा प्रतिदिन दिला जातो. प्रतिलाभार्थी ३० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ २० ग्रॅम, गहू ८० ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम व साखर २० ग्रॅम दिली जाते.
२) गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चवळी अथवा चना प्रतिदिन प्रतिलाभार्थी ४० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ ३१.५ ग्रॅम, गहू ८८ ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम, साखर २० ग्रॅम असा आहार दिला जातो.
३) गरोदर माता किंवा स्तनदा माता यांना दररोज १९५.५ ग्रॅम पूरक पोषण आहार पॅकिंग करून दिला जाते. तर बालकांना १६६ ग्रॅम वजनाचा आहार प्रतिदिन दिला जात आहे.
.........................
फोडणी कशी द्यायची?
चार महिन्यांपासून खाद्यतेल देणे बंद झाले आहे. त्यामुळे पोषण आहाराला फोडणी कशी द्यावी, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे आम्हाला घरपोहोच पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला आम्हाला एक-दोन महिने खाद्यतेलाऐवजी साखर मिळेल असे वाटत होते.
-अंजली हुकरे, गरोदर महिला, पदमपूर
..............................
शासनाने तेलाला कात्री लावल्याने अडचणीचे ठरत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीमार्फत पूरक आहाराचे साहित्य मिळत आहे. चार महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी साखर दिली जात आहे. परंतु, फोडणीसाठी तेल आवश्यक आहे. याचा विचार करून पुन्हा साखरेऐवजी खाद्यतेल वाटप करावे.
- गौरी प्रमोद बागडे
स्तनदा माता, मुंडीपार
..........................................
आमच्या बाळाला अंगणवाडीमार्फत कोरोनाच्या काळातही घरपोहोच पूरक पोषण आहाराचे साहित्य देण्यात आले आहे. परंतु, तेलाऐवजी साखर दिली जात आहे. पूर्वीप्रमाणे साखरेऐवजी खाद्यतेल मिळणे अपेक्षित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सुनील हुकरे, पालक आमगाव
.........................
कोट
सुधारित पाककृतिपत्रही अंगणवाडी केंद्रांना वितरित करण्यात आलेले आहे. पोषण आहारात शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत असून, या साहित्याचे व्यवस्थित वितरण होत आहे. शासनानेच खाद्यतेल वगळून साखरेचा आहारात समावेश केलेला आहे.
- संजय गणवीर,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला-बाल कल्याण जि.प., गोंदिया