लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : भरडाई केलेल्या सी.एम.आर.तांदूळ गोदामामध्ये जमा करण्याच्या नावावर वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात शासनाची लूट केली जात असल्याची तक्रार रोशन बडोले यांंनी लोकायुक्तांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.पूर्व विदर्भाात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. धान खरेदीसाठी केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. यात खरेदीसाठी केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र शासन आदिवासी विभागामध्ये धान खरेदी करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळ मर्या.नाशिक आणि दि महाराष्ट्र स्टेट को आॅफ मार्केटिंग फेडरेशन मुंबई केंद्र शासनाच्या मानदंडानुसार धान खरेदी व भरडाईचे काम करते. भरडाईवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांचा समावेश आहे. खरेदी केलेल्या धानाची भरडाई करुन सी.एम.आर. तांदुळ संबंधित गिरणी मालकामार्फत विविध शासकीय गोदामात जमा होईपर्यंत सर्व जवाबदारी अभिकर्ता संस्थेची आहे. अभिकर्ता संस्था यांनी प्रमाणपत्र देताना जवळच्या मिलकरीता व जवळच्या मार्गाने वाहतूक केल्याबाबतचे प्रमाणपत्र दयावे असे शासनाचे आदेश आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील राईस मिल धारकांना सी,एम.आर. तांदूळ जमा करण्यासाठी फुटाळा व सौंदड जवळ असूनही २५ ते ३० कि.मी. अंतरावर असलेल्या नवेगावबांध येथे पाठविल्या जाते. कोहमारा यांना सौंदड येथील गोदामात तर डव्वा, पांढरी, कोसमतोंडी येथील राईस मिल धारकांना ६० कि.मी. असलेल्या आमगाव गोदामात पाठवितात. यामुळे दोन वर्षापासून वाहतुकीच्या नावावर शासनाला लाखो रुपयांचा चूना लावण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप बडोले यांनी तक्रारीतून केला आहे. यात काही अधिकाऱ्यांचा सुध्दा सहभाग असून त्यांची चौकशी करण्याची मागणी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रोशन बडोले यांनी लोक आयुक्तांकडे केली आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे तक्रारीची प्रत पाठविली आहे.
वाहतुकीच्या नावावर शासनाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:15 PM
भरडाई केलेल्या सी.एम.आर.तांदूळ गोदामामध्ये जमा करण्याच्या नावावर वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात शासनाची लूट केली जात असल्याची तक्रार रोशन बडोले यांंनी लोकायुक्तांकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देलोकआयुक्ताकडे तक्रार : चौकशी करून कारवाईची मागणी