लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील पत्रकार हा जीवाची पर्वा न करता, वृत्त संकलनासाठी जात आहे. वेळोवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लेखणीने सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे, सोईसुविधा पुरेपूर मिळव्यात म्हणून लगबग करत आहे. अशावेळी शासन हे कोरोनाची परिस्थिती पाहून सर्व घटकांना मदत करत आहे. शासनाने प्रत्येक पत्रकाराला दहा हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ, गोंदिया जिल्हा शाखेने केली आहे.
कोरोनाचा काळ हा जीवघेणा आहे. अनेकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे, कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिक, विधवा, निराधार तसेच कोरोनामध्ये कोणतेही काम न करता, अनेक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मात्र वेतन नित्यनियमाने शासन देत आहे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकवेळी पत्रकार हा बातमीच्या निमित्ताने दिवसभर आपले काम चोखपणे करत आहे. अनेक स्तरावरच्या बातम्या संकलन करुन प्रसारमाध्यमातून प्रसारीत करत असतो. अनेक पत्रकारांवर कोरोनापासून उपाशी राहण्याची वेळ आली आहे. लाॅकडाऊन असल्याने पोट भरणे फारच कठीण झाले आहे. शासनाने पाचशे कोटी पत्रकारांसाठी मदत जाहीर करावी आणि प्रत्येक पत्रकाराला मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा गोदिंयाचे अध्यक्ष सतीश कोसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख मुन्नाभाई नंदागवळी, सचिव बाबुलाल नेवारे, कोषाध्यक्ष के. ए. रंगारी, उपाध्यक्ष कुमारसिंह सोमवंशी यांनी केली आहे.