अग्रवाल यांचे प्रयत्न : ग्राम विकास व शिक्षण सचिवांचे आदेश गोंदिया : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रकरणावर अखेर पूर्ण विराम लागला आहे. या प्रकरणी ग्राम विकास व शिक्षण सचिवांनी शिक्षकांच्या संच मान्यतेची तपासणी करून नियमानुसार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. शिवाय रिक्त पद असलेल्या जागांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन अंतर्गत बदल्यांना मंजूरी दिली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगनादेशाने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली होती. त्यामुळे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्या मागणीवरून लोकलेखा समिती प्रमुख आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या विषयाला घेऊन शिक्षण सचिव नंदकुमार व ग्राम विकास सचिव वी. गिरीराज व शिक्षण सभापती कटरे यांची बैठक मुंबई येथे घेतली. बैठकीत सभापती कटरे यांनी शिक्षकांची बाजू मांडत शिक्षकांच्या बदल्यांबरील स्थगनादेशाने शिक्षक व शाळांच्या संचालनात होत असलेल्या अडचणी मांडल्या. यावर आमदार अग्रवाल यांनी, शिक्षकांच्या अभावामुळे नागरिक आल्या दिवशी शाळा बंद करीत असल्याचे सांगीतले. तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील देवरी सारख्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त तालुक्यात ८० पदे रिक्त असल्याचे सांगीतले. अशात शासनाने कोणत्या परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या थांबविल्या ही बाब बाजूला सारून रिक्त पदांवर शिक्षकांच्या बदल्या करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळांत शिक्षकांची कमतरता आहे तेथे शिक्षकांची नियुक्ती कोणत्याही परिस्थितीत करण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून ग्राम विकास सचिव गिरीराज व शिक्षण सचिव नंदकुमार यांनी, गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या संच मान्यतेची तपासणी करून नियमानुसार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले. तसेच शिक्षकांचे समायोजन करून जेथे-जेथे शिक्षकांचे पद रिक्त आहेत तेथे अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजन अंतर्गत बदल्यांना मंजूरी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
समायोजनांतर्गत बदल्यांना शासनाची हिरवी झेंडी
By admin | Published: August 01, 2016 12:03 AM