सडक अर्जुनी : अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध आपला कौल देऊन रोष व्यक्त केला. सत्ताधारी जनतेची कामे मार्गी लावण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप केला. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता स्थापन झाल्याचा दावा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला.
सडक अर्जुनी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम शनिवारी स्थानिक आशीर्वाद सभागृह येथे करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, भाजप प्रदेश सचिव संजय पुराम, जिल्हा संघटनमंत्री संजय कुलकर्णी, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, तालुकाध्यक्ष अशोक लंजे, लक्ष्मीकांत धानगाये, डाॅ. भुमेश्वर पटले, डॉ. बबन कांबळे, चेतन वळगाये, गिरधारी हत्तीमारे, महिला तालुकाध्यक्ष पदमा परतेकी, कविता रंगारी, शीला भेंडारकर, पाथोडे, शीला चव्हाण, रूपाली टेंभुर्णे उपस्थित होते. बडोले म्हणाले, सरपंच व सदस्यांनी सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. विजयी झालेल्या उमेदवारांनी गटातटाचे राजकारण बंद करून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. १९ ग्रामपंचायतींपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरपंच व उपसरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून येण्याची किमया घडली. तालुक्यातील प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. डव्वा येथील माजी सरपंच चुन्नीलाल कोरे, शारदा किसान, शालीदर कापगते, रामलाल सय्याम, बेतनलाल बिसेन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अशोक लंजे यांनी मांडले. संचालन महामंत्री शिशिर येळे व आभार युवा मोर्चा अध्यक्ष विलास बागळकर यांनी मानले.