गोरेगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) गोरेगाव तालुकातर्फे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारी (दि.२०) पंचायत समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. सदर मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे राज्य सचिव मिलिंद गणवीर, जिल्हाध्यक्ष यादोराव टेंभरे, उपाध्यक्ष रविंद्र फरदे, सहसचिव टेकचंद चौधरी, उपाध्यक्ष मुन्नालाल ठाकरे, तालुका अध्यक्ष उत्तम डोंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी हरिणखेडे व विस्तार अधिकारी सिंगनजुडे यांना सादर करून चर्चा करण्यात आली. तक्रार निवारणाची सभा घेण्यात येईल व आॅक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत ग्रामपंचायत रेकार्ड तपासणी कार्यक्रम घेण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. मागण्यांमध्ये ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना किमान वेतन व भत्ता मिळणे, दर महिन्याच्या ५ तारखेच्या आता वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी खात्यात वेतन भत्त्याच्या रकमेवर ८.३३ टक्के निधी जमा करणे, सेवाशर्तींची अंमलबजावणी व उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, तक्रार निवारण समितीच्या वर्षात तीन सभा घेणे, कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतवर असलेली थकबाकी त्वरित देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात प्रामुख्याने राजेंद्र हटेले, बुधराम बोपचे, हिरोज राऊत, मिथून राहुलकर, लेखचंद दिहारी, सोमेश्वर राऊत, निलेश मस्के, प्रेमलाल लांजेवार, छगन कुंभले, मुकेश उपराडे, महेंद्र कटरे, महेंद्र भोयर व अनेक कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )
ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा पं.स.वर मोर्चा
By admin | Published: September 24, 2016 1:56 AM