तिरोडा : तालुक्यातील ग्रामपंचायत खमारी येथील सरपंच सविता भूपेंद्र पटले यांनी कर्तव्यात कसूर केल्याने कलम ३९(१) अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या आदेशानुसार त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. उपसरपंच कमलकिशोर कटरे यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार सोपविण्यात आला.
ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. २६०, १९६ व १०२ ची मोजणी ग्रा.पं.मध्ये चर्चा न करता तसेच परवानगी न घेता सरपंच यांनी मोजणी करून घेतली. संगणक परिचालक कोमल ठाकरे यांनी २०११ ते २०१५ कालावधीत जमा झालेली रक्कम ग्रामपंचायत फंडात जमा न केल्याचे कारण सांगून वरिष्ठांकडून रुजू करण्याचे निर्देश असतानासुध्दा ग्रा.पं.मध्ये रुजू न करणे, व ग्रा.पं. संगणक कक्षास स्वत:च्या घरचे कुलूप लावणे, अंगणवाडी दुरुस्तीकरिता ग्रामपंचायत कमिटीला विश्वासात न घेता स्वमर्जीने काम करणे, ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टरवर नमुना-८ वर नियमबाह्यरित्या खोडतोड करून भोगवटदाराचे नाव कमी करून भोगवटदारांची नावे कमी-जास्त करणे, असे नियमबाह्य कार्य केल्यामुळे आयुक्त मिलिंद साळवे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार दोषी ठरवून अपात्र ठरविले आहे.