साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील एकूण नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्या. साखरीटोला परिसरात सातगाव, कारुटोला व कोटरा या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या ठरल्या होत्या. कोटरा येथे काँग्रेसचे, तर कारुटोला येथे भाजपचे सदस्य अधिक निवडून आले. त्यामुळे सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित नाही.
सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतीच्या बाबतीत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात सातगाव - साखरीटोला राजकारणाचे केंद्र असल्याने येथे सरपंच कोण बनणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या सातगाव ग्रामपंचायतअंतर्गत पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच, भाजपचे तीन तर अपक्ष एक असे सदस्य निवडून आले. त्यामुळे बहुमत काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचा सरपंच बनणार असे वाटत असेल तरी मागील काही दिवसांपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याची माहिती आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले एक सदस्य डॉक्टर असून, स्वत:ला काँग्रेसचे मानतात. त्यामुळे सरपंच बनण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याची जोरदार चर्चा आहे. इकडे काँग्रेसचे सदस्य पर्यटनाला गेले असून, ऐन वेळेवर उपस्थित होतील. भाजपला सत्ता स्थापनेसाठी दोन सदस्यांची गरज आहे. त्यामुळे सरपंच आपलाच व्हावा, याची खबरदारी घेऊन प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे सदस्य फुटणार नाहीत, यासाठी मागील दहा दिवसांपासून आऊट ऑफ कवरेज आहेत. अत्यंत महत्त्वाची व आर्थिक सोर्स असलेली ग्रामपंचायत म्हणून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. निवडून येणारा प्रत्येक सदस्य आपणच सरपंच व्हावा, म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे बोलले जात आहे.