देवरी : संपूर्ण जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदी अद्याप सुरू झाली नाही. काही केंद्रांवर १ जूनपासून रबी हंगामातील धान खरेदी करणार, अशी घोषणा शासनाने केली होती. मात्र, मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने रबीतील धान कुठे ठेवायचे, असा प्रश्न आहे. माजी आ. संजय पुराम यांची भेट घेऊन धान खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती केली. यावर धानाची साठवणूक व खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तालुक्यातील बंद असलेल्या आश्रमशाळा संस्थांना देण्याची विनंती माजी आ. संजय पुराम यांनी प्रकल्प अधिकारी राचलवार यांना केली. त्यांनी याला लगेच सहमती दर्शविली.
आश्रमशाळा दोन महिन्यांकरिता देण्याचे कबूल केले. यामुळे आता तालुक्यातील सर्व आश्रमशाळांचा वापर धान खरेदीकरिता संस्थांना करता येणार आहेत. आदिवासी शेतकरी बंधू-भगिनी यांच्या समस्यांचे निराकरण झाल्यामुळे सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी संजय पुराम यांचे आभार व्यक्त केले आहेत. चर्चेच्या वेळी माणिकचंद आचले, रामेश्वर बहेकार, लक्ष्मीशंकर मळकाम उपस्थित होते.