गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे (आयटक) सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांना घेवून सडक अर्जुनी पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे राज्य सचिव मिलिंद गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष कयूम शेख, रविंद्र फरदे, विष्णू हत्तीमारे यांनी केले. बस स्टँड चौकातून मोर्चा काढून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन मिळणे, भविष्य निर्वाह निधी खात्यात वेतन व भत्त्याच्या एकूण रकमेवर ८.३३ टक्के रक्कम जमा करणे, सेवाशर्तींची अंमलबजावणी करणे व उल्लंघन करण्याऱ्यांवर कारवाई करणे आदी मागण्यांचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी झेड.डी. टेंभरे यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी कर्मचारी, संघटना, ग्रामसेवक, बीडीओ यांची संयुक्त सभा घेण्याचे मान्य करण्यात आले. महासंघाने सदर समस्यांना घेवून ५ आॅक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर होणाऱ्या बेमुदत आंदोलननात सहभागी होण्याचे आवाहन मिलिंद गणवीर यांनी केले. संचालन शत्रुघ्न लांजेवार यांनी केले. आंदोलनात प्रामुख्याने डुलेश गोटेफोडे, खुशाल बनकर, देवानंद मेश्राम, मुकेश कापगते, रमेश प्रधान, निलकंठ फुलुके, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या ललिता राऊत, निर्मला बोरकर यांच्यासह शंभराधिक कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: September 21, 2016 12:55 AM