नवेगावबांध : ग्राम बोरटोला येथील ग्रामपंचायतच्यावतीने नियमित कर भरणाऱ्या गावातील ७५ नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा तान्हा पोळाचे निमित्त साधून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव सयाम होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर, पोलीस पाटील शंकर तरोणे, सरपंच कुरुंदा वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, भारती डोये, वनिता मेश्राम, दीपंकर उके, राजकुमार मेंढे प्रेमलाल नारनवरे, नितीन खंडाईत, सुशील येरणे व बोरटोला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील घर टॅक्स निल करणाऱ्या व नियमित कर्ज भरणाऱ्या ७५ नागरिकांचा जबाबदार नागरिक म्हणून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आतापर्यंत गावचे पदाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या व ज्येष्ठ माजी सरपंच देवराम कापसे, रवींद्र खोटेले, गिता नारनवरे, शेवंता गुढेवार, माजी रोजगार सेवक धर्मनाथ मानकर, माजी पोलीस पाटील शंकर कापसे यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन सचिन रोकडे यांनी केले. आभार उपसरपंच काशिनाथ कापसे यांनी मानले.