लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गोंदिया येथील अंकीत फत्तेसिंह चव्हाण यांनी हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतकडे जागेच्या मागणीकरिता अर्ज केला. सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा गंगेझरी येथील शासकीय भूमापन क्र. १६ आराजी १.१० हे.आर. जागेपैकी ०.६० जागा या कामासाठी देण्याचे ग्रामपंचायतने निश्चित केले. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी सोमलपूर ग्रामपंचायतने विशेष मासीक सभा बोलाविली.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लिलेश्वर खुणे व इतर नऊ सदस्य उपस्थित होते. सभेत ठराव क्रमांक २ नुसार चर्चा करण्यात आली. सदर शासकीय जागा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असूनही जागे भाडे तत्वावर दिल्यास ग्रामपंचायतचे आर्थिक स्त्रोत बळकट होऊन उत्पादनात भर पडेल व आर्थिक उत्पन्नापासून लोकहितकारी व विकासात्मक कामे करुन जीवनमान उंचावण्यास मदत होईल. म्हणून २५ हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा ठराव पारित करण्यात आला. याच सभेत ठराव क्र. १ नुसार अर्जदाराला ग्रामपंचायतकडून ना हरकरत प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेण्यात आला.ही सभा आटोपल्यानंतर त्याच दिवशी सरपंच खुणे, ग्रामसेवक एन.एन. ब्राम्हणकर यांनी गोंदिया येथे जाऊन अंकीत चव्हाण यांना लेखी करारनामा करुन दिला. याच वेळी ४ फेब्रुवारी २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२४ या ५ वर्षाच्या कालावधीसाठी ही जागा २५ हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे भाड्याने देण्यात आली. पहिल्या वर्षाची अग्रीम राशी अंकीत चव्हाण यांच्याकडून धनादेश क्रमांक ८२६२७४ अन्वये ग्रामपंचायतला अदा करण्यात आली. सरपंच व ग्रामसेवकाकडून एकाच दिवशी हे सर्व सोपस्कार पार पाडण्यामागची नेमकी भूमिका कोणती हे अद्याप गुलदस्त्यात आहे.सातबारा उताऱ्यानुसार या जागेचा मालक सरकार आहे व इतर अधिकारात झाडांचा जंगल जि.प. नोंदीप्रमाणे सदर गट क्रमांक चराई करिता व निस्तार कटिबंधाकरिता राखून ठेवण्यात आला असल्याचा उल्लेख आहे. मात्र ही जागा ग्रामपंचायतला हस्तांतरीत झाली असल्याची कुठेही नोंद नाही. मग आपल्या मालकीची जागा नसतानाही ग्रामपंचायतने भाडे तत्वावर देण्याचे नेमके औचित्य काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. या संदर्भात बरीच राजकीय खलबते सुरु असून हे प्रकरण दडपण्यात येते की वरिष्ठ स्तरावरुन काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर जागा ही निस्तारासाठी आहे. या जागेवरील आमराईचा ग्रामपंचायतकडून यापूर्वी लिलाव व्हायचा. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतचे उत्पन्नात वाढ होऊन अधिकाधिक विकासात्मक कामे व्हावीत यासाठी ग्रामपंचायतने भाडेतत्वावर दिली होती.- लीलेश्वर खुणे, सरपंच, सोमलपूर
शासन मालकीची जागा ग्रा.पं.ने दिली भाड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 8:42 PM
गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांटसाठी सोमलपूर ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव घेऊन शासन मालकीची जागा भाड्याने दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देविशेष मासिक सभेचा ठराव : कारवाईकडे लागले नागरिकांचे लक्ष