ग्रा.पं.सदस्य व गावकऱ्यांचा संताप : ग्रामसेवक व सरपंचाचा मनमानी कारभार साखरीटोला : सालेकसा पंचायत समितीअंतर्गत ग्राम पंचायत भजेपार येथील ग्रामसेविका भारती वाघमारे आणि सरपंच प्रभा कलचार यांनी आपसात संगनमत करून गावाच्या विकासासाठी आलेल्या शासकीय रकमेची अफरातफर केली असा आरोप करीत ग्रामपंचायत सदस्य व काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला मंगळवारी कुलूप ठोकले. एवढेच नाही तर गैरकारभाराची तक्रार पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. ग्रा.पं.सदस्य सावलराम बहेकार, गिता ब्राम्हणकर, शांता बहेकार, सरस्वता बहेकार, सरिता बहेकार, निर्मला कठाणे यांनी यासाठी पुढाकार घेतला. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी ग्रामपंचायतमधील गैरकारभाराची १५ आॅगस्टपर्यंत चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर १६ आॅगस्ट रोजी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकून उपोषण सुरू करण्याचा इशारा वरिष्ठांना दिला होता. त्यानुसार कोणतीच चौकशी न झाल्याने कुलूप ठोकून ग्रा.पं.च्या सदस्यांसह मोठ्या संख्येत गावकरी ग्रा.पं.कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे व पंचायत विस्तार अधिकारी यु.टी.राठोड यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन स्थिती हाताळली. दि.१९ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन चौकशी करण्यात येईल. त्यामुळे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केल्यावर ग्रा.पं.चा रेकॉर्ड असलेल्या खोलीला कुलूप ठोकून ग्रा.पं.सदस्य व गावकऱ्यांनी तात्पुरते उपोषण आंदोलन मागे घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भजेपार येथे मौका स्थळी येऊन चौकशी करावी, ग्रामसेविका वाघमारेच्या कार्यकाळात कोणकोणत्या योजनांची किती रक्कम ग्रा.पं.ला प्राप्त झाली, कोणते काम झाले हे गावकऱ्यांना समजावून सांगावे अशी मागणी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरपंचाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ग्रामसेवकाकडून पैशाचा हिशेब दिला जात नाही. त्यामुळे या कारभारावर नियंत्रण नाही. (वार्ताहर)
ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
By admin | Published: August 18, 2016 12:13 AM