केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच पार पडली. त्यात निवडून आलेल्या गाव पुढाऱ्यांनी गावच्या विकासाची कटिबद्धता स्वीकारून सदस्य-पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे. बहुतेक गाव पुढारी हे नवीन आहेत. गावच्या विकासासाठी शासनाच्या ध्येय धोरणाची पुरेशी माहिती असल्याशिवाय गाव विकासाची दिशा ठरविता येत नाही. परिणामी गावाचा विकास होत नाही. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
पंचायत राज व्यवस्थेतील सरपंच, उपसरपंच, सदस्य हे महत्त्वाचे घटक असून, गाव विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना असणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामसेवकाला, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती स्तरावरून लेखी स्वरूपात देण्यात येते. मात्र, या योजनांची माहिती अनेक गावांमध्ये ग्रामसभेतून दिली जात नाही, अशी नागरिकांची ओरड असते. सध्या तर कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक अडचणीमुळे ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य शासकीय योजनांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. काही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी गावातील विशिष्ट मंडळींनाच योजनांची माहिती सांगून मोकळे होतात, अशी अनेकदा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत राहतात. त्यामुळे शासकीय योजनांपासून मुख्य लाभार्थी वंचित राहतात. त्याचबरोबर गावचा अपेक्षित विकास साधता येत नाही. परिणामी गावाचे अथवा नागरिकांचे नुकसान होत असते. त्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामविकासासंबंधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.