लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : गावातील नाल्यांमध्ये गाळ व कचरा साचून ते तुडुंब भरले आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाले स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच कोरोना महामारीचे विषाणू हवेच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाले स्वच्छ करुन सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करुन केशोरी-कनेरी हे गाव निर्जंतुक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी-कनेरी याठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा विस्फोट झाला होता. त्याची तालुका प्रशासनाने दखल घेऊन ३० मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करुन संचारबंदी केली. यामुळे विषाणूच्या संसर्गाला आळा बसला. आता कोरोनाबाधितांची संख्या कमालीची कमी झाली आहे. यापूर्वी एकदा ग्रामपंचायतीने गावात निर्जंतुक फवारणी केली असून, त्याला १५-२० दिवसांचा कालावधी लोटला आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून, पावसाळ्यापूर्वी कचरा आणि गाळाने तुडुंब भरलेले नाले स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच गावात कीटकजन्य आजार किंवा कोरोना विषाणू्च्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करुन गाव निर्जंतुक करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.