गोंदिया : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवकांनी थोपटलेला दंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची झालेली बदली लक्षात घेता ग्रामसेवक युनियन आता हळूहळू शांत होत आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ग्रामसेवकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी असहकार आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन प्रथम टप्प्यात परावर्तित करीत असल्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गोंदियाद्वारे पुकारलेल्या असहकार आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसेवक आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी झाले होते.
ग्रामसेवक २६ न्याय मागण्यांना घेऊन आंदोलनात उतरले होते. समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु एकही समस्या सोडविली नसल्याने ग्रामसेवकांनी आंदोलन सुरू केले होते. १ सप्टेंबरपासून आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या किल्ल्या खंडविकास अधिकारी यांच्याकडे सोपविणार होते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांची झालेली बदली व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्या संदर्भाने तीव्र भावना, जनतेला होणारा नाहक त्रास व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागण्यांसंदर्भात दिलेल्या आश्वासनामुळे हे असहकार आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत टप्पा एकमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी म्हटले आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर. एल. पुराम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्तिक चव्हाण, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, सचिन कुथे, कविता बागडे, एल. आर. ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के.रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार उपस्थित होते.