गोंदिया : ९२ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अफरातफर प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सोमवारी दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी (दि.१३) सालेकसा तालुक्यातील तत्कालीन एका ग्रामसेवकावर ३६ लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ एम. राजा. दयानिधी यांनी दिले आहे. यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सालेकसा तालुक्याच्या कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी खंडविकास अधिकारी सालेकसा व अर्जुनी मोरगाव यांना दिले आहेत. प्राप्त माहितीनुसार सालेकसा तालुक्याच्या ग्रामपंचायत कावराबांध येथे कार्यरत असताना ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याने दप्तरी प्रमाणके नसताना प्रमाणकाशिवाय खर्च नोंदविणे, खरेदी केलेल्या साहित्याचा नोंद साठा रजिष्टरला न घेणे, बँकेतून धनादेशाचे शोधन स्वत: रोखीने करणे, मासिक सभा व ग्रामसभेचे कार्यवृत्त ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध न ठेवणे, ग्रामपंचायत दस्ताऐवज अद्यावत न करता वारंवार वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे आदीचा ठपका रोकडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासर्व प्रकरणात चौकशी केली असता रोकडे दोषी आढळले. त्याची चौकशी सुरू असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामपंचायत भरनोली येथे बदली करण्यात आली. त्या ठिकाणीही त्याने अपहार केल्यामुळे त्याच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. वारंवार पैसे हडपण्याची सवय रोकडे यांची मोडत नसल्याचे पाहून त्याला निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले आहे. व्ही.जे.रोकडे याने महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९९७ मधील नियम ३ चे उल्लघंन केले आहे. त्यांनी अपहारीत केलेली शासकीय रक्कम त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणात योग्य व नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ती रक्कम जमा करीत नसल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून शासकीय रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.
ग्रामसेवकाने केला ३६ लाखांचा अपहार, दोन दिवसात तीन ग्रामसेवकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:08 PM