अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन १६ ऑगस्ट पासून सुरू आहे. यामुळे गावकऱ्यांना विविध दाखले तसेच ग्रामपंचायत संबंधित कामे करण्यास अडचण होत आहे.
ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असून ग्रामीण विकासात ग्रामसेवकांचा सिंहाचा वाटा असतो. शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायत मार्फत गावात राबवून गाव विकास साधण्यासाठी ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. परंतु शासन व प्रशासनातर्फे अन्याय होत असल्यामुळे ग्रामसेवक युनियन तर्फे दिनांक १६ ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू असल्यामुळे गाव खेड्यातील विकास कामे खोळंबलेली आहेत. ग्रामीण जनतेला ग्रामपंचायत मधून अनेक दाखले मिळवावी लागतात त्यामुळे सुद्धा दाखल्यांसाठी जनतेला भटकावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती समोर असहकार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवक युनियनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना आपल्या मागण्यासंबंधी निवेदन देत असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे.
......
आशा आहेत प्रमुख मागण्या
ग्रामसेवक विनोद श्रीवास्तव महागाव यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढणे, कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव शासनास पाठविणे, स्थायी कर्मचारी प्रकरणे निकाली काढणे यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे.
............
३० नंतर किल्ल्या सोपविणार
शासन व प्रशासनाने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ३० ऑगस्टपासून ग्रामपंचायत अभिलेख बंद करून ग्रामपंचायतच्या किल्ल्या शिक्के गटविकास अधिकारी यांना सुपूर्द करून साखळी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ग्रामसेवकांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण जनतेला दाखले मिळत नसल्यामुळे विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तालुका युनियनचे अध्यक्ष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे.