गोंदिया : विविध मागण्या व समस्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना गोंदियाच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांना देण्यात आले. निवेदनात कृषी सहायकांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करणे, कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सर्व कृषी सहायक यांना विनाअट ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सर्व कृषी सहायक यांना वयाची अट न ठेवता कोविड-१९ चे लसीकरण करावे, इतर खात्याप्रमाणे कोविड-१९ च्या काळात जनसंपर्क वाढविणाऱ्या विविध कार्यक्रम जसे की गाव बैठक, प्रशिक्षणे, शेतीशाळा कोरोना परिस्थितीमुळे स्थगित करण्याबाबतचे निर्देश देणे, कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर पूर्ववत कार्यक्रम राबविण्यात येतील, आदी मागण्यांचा समावेश होता. मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही तर संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. २४ मे रोजी कृषी सहायक काळी फिती लावून काम करणे, २८ मे रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन, १ ते ४ जून रोजी कामकाजाचे रिपोर्टिंग न करता असहकार आंदोलन व यानंतरही मागण्यांची पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हाध्यक्ष देवेंद्र पारधी, जिल्हा सचिव इंद्रपाल बागडे, कार्याध्यक्ष सुरेंद्र खुजे प्रामुख्याने उपस्थित होते.