आमगाव : केंद्र सरकारच्या घरकूल योजनेतून मिळालेले घर बांधकाम अनुदान राज्य शासनाच्या तुघलकी कारभारामुळे अडल्यामुळे लाभार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. घर बांधकाम निधीअभावी अडल्यामुळे पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ घरकूल योजनेतील लाभार्थ्यांवर आली आहे.
केंद्र व राज्य सरकार यांच्या मदतीने पंतप्रधान घरकूल योजना नागरिकांसाठी सार्थक ठरली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी घरकूल बांधकामाला सुरुवात केली आहे. प्रशासनाने या बांधकामावरील पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांना मंजूर करून दिले. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकूल बांधकामासाठी अनुदान लवकर मिळत असल्यामुळे उधार-उसने घेऊन संपूर्ण घरकूल बांधकाम पूर्ण करून घेतले. तर याच बांधकामात काहींनी पावसाळ्यात शेती नियोजनातील राखून ठेवलेला निधीही खर्च करून टाकला. त्यामुळे घरकूल बांधकामाचे नियोजन फसले आहे. लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामनाही करावा लागत आहे.
सामान्य जनतेला हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून एक लक्ष ५१ हजार ४२६ रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. घरकूल बांधकाम ॲग्रिमेंट झाल्यावर संबंधित विभाग लाभार्थ्यांना २० हजार रुपयांचे अनुदान देते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान मंजूर करून देण्यात येते. परंतु घरकूल बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा अनुदान मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
----------------------------
शासनाने त्वरित अनुदान द्यावे
तालुक्यातील जनतेने पंतप्रधान घरकूल योजनेतून घराचे बांधकाम केले. स्वत:च्या शेती नियोजनातील जमा रक्कम खर्चून घर बांधकाम पूर्ण केले. आता शेतीचे नियोजन आर्थिक अडचणीमुळे थांबले आहे. लाभार्थ्यांना शासनाने त्वरित अनुदान द्यावे, अशी मागणी चिळचाळबांधचे उपसरपंच सुधीर पटले यांनी केली आहे.