गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात कोरोनाचा ग्राफ पुन्हा उंचावला आहे. शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना संसर्गात वाढ होत असल्याने शिक्षण विभागासमोरसुद्धा पेच निर्माण झाला आहे.
गुरुवारी (दि. २५) जिल्ह्यात ८८ कोराेनाबाधितांची नोंद झाली तर ४९ बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेल्या ८८ रुग्णांमध्ये सर्वाधिक २८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव २४, गोरेगाव १, अर्जुनी मोरगाव ९, सडक अर्जुनी ७, देवरी ५, तिरोडा १०, सालेकसा ३ बाहेरील जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू या विद्यार्थ्यांभोवती कोरोनाचा विळखा वाढत आहे. बुधवारी आमगाव तालुक्यातील १६ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते. तर गोंदिया, आमगाव, तिरोडा ता तीन तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोनाचा ग्राफ सातत्याने उंचावत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ९८,१०८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८५,७७४ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ८४,१९२ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७७,७२० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १५,३३० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४,५६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्य:स्थितीत ५७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ३२० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हायचा आहे.
............
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ८.५४ टक्के
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मार्च महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजारांच्या पार झाला आहे. पण कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर चांगला असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर ८.५४ टक्के आहे.
.......