गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असून, कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरायला लागली आहे. कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यासुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील दीड हजारांवर बेडसुध्दा आता रिकामे असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
रविवारी (दि. ३०) जिल्ह्यात ६५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. ३ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या थोडी अधिक असली तरी रुग्ण वाढीचा आकडा हा दोन अंकी व रुग्ण संख्या नियंत्रणात असल्याने चिंतेची बाब नाही. १ ते ३० मे दरम्यानच्या कोराेना बाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोना बाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३७४ वर आली आहे. मात्र, कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने थोडी चिंता कायम आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १,६४,४८२ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी १,३९,०४० नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १,५७,७३८ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,३६,८८३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,६६५ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ३९,६०३ जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत ३७४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ६११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
२,९९० नमुन्यांची चाचणी, ७५ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी २,९९० स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,२१८ आरटीपीसीआर, तर ७७२ रॅपिड अँटिजन नमुने अशा एकूण २,९९० स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७५ नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट २.५१ टक्के आहे.
...............
एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ३६५ बाधितांचे मृत्यू एप्रिल महिन्यात झाले, तर १ ते ३० मे दरम्यान एकूण ६८ बाधितांचा मृत्यू झाला. मे महिन्यात कोरोना बाधितांचे प्रमाण बरेच कमी झाले असले तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे याला ब्रेक लागण्याची गरज आहे.