लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुध्दा कोरोनाचा उद्रेक झाला असून, जिल्ह्यात सुद्धा दररोज आकडे वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. गुरुवारी जिल्ह्यात ६१६ बाधितांची नोंद झाली, तर १६ बाधितांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, तर २५५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३६४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९८, गोरेगाव २, आमगाव ३५, सालेकसा १९, देवरी २८, सडक अर्जुनी ४६, अर्जुनी मोरगाव १८ आणि बाहेरील राज्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,१९,८०५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,०२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १,०९,३१९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९७,६७४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २३,४४८ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १७,०९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६,०३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १८०८ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.......
सहा दिवसांत वाढले साडेपाच हजार रुग्ण
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचा तीन आकडी पाढा कायम असल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी जिल्हावासीयांनी सावध होण्याची गरज आहे.
........
पाच दिवसांत ५६ बाधितांचा मृत्यृू
जिल्ह्यात कोरोना वेगाने आपले पाय पसरत असताना बाधितांच्या मृत्यूृचा आकडादेखील वाढत आहे. मागील पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.