गोंदिया : जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली असून कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र, धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसून जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. संसर्ग आटोक्यात येतोय म्हणून बेफिकीर होऊ नका, तर पूर्वीएवढी काळजी घेतली तरच जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. अन्यथा पुन्हा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुक्रवारी (दि.७) जिल्ह्यात ५५५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ३६४ नवीन रुग्णांची नोंद झाली. ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या ३६४ रुग्णांमध्ये सर्वाधिक १५५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २३, गोरेगाव १६, आमगाव ३८, सालेकसा ५४, देवरी ४७, सडक अर्जुनी २२, अर्जुनी मोरगाव ४ आणि बाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. मागील आठ- दहा दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदरात सुद्धा बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र, धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांना स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३८३५६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११३७५९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत १४१४१७ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२१५०६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३६१०१ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३१२७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४२४५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २०६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.........
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर अधिक
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तर बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा जिल्ह्याचा दर ८६.६३ टक्के आहे तर राज्याचा रिकव्हरी दर ८५.५४ टक्के आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
.............
लसीकरण मोहिमेला आली गती
गोंदिया जिल्ह्याला गुरुवारी कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा गती आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ६९३७७ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणासंदर्भात कुठलीही भीती न बाळगता पुढे यावे, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.