गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत तब्बल १२५८३ बाधितांनी कोरोनावर मात केली असून मात करणाऱ्यांचा ग्राफ सातत्याने उंचावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेतल्यास निश्चितच जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवारी (दि.४) जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या तब्बल ५८३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ५१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या ५१३ रुग्णांमध्ये सर्वाधिक १६१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा २८, गोरेगाव २९, आमगाव ५७, सालेकसा ५२, देवरी ९४, सडक अर्जुनी ३० व बाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे तसेच ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यामुळे गर्दी कमी करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. मात्र, नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज असून धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३६५४२ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १११०३० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. त्यातंर्गत १३९१२३ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११९६५९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४९१८ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २९४७३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४८८२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ४१३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
................
१ लाख ६६ हजार जणांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे तर तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण केले जात असून यातंर्गत १०८९ युवकांनी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
...........
लस पुरवठ्याची समस्या कायम
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग कोरोना लसीकरणासाठी व्यापक जनजागृती करत आहे. लसीकरण कसे वाढेल यााठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात केवळ दोन तीन दिवस पुरेल एवढाच साठा असून सध्या केवळ १४० पैकी १४ केंद्रावरून लसीकरण सुरू आहे.