अंकुश गुंडावार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार’ म्हणून आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. खरीप व रब्बी हंगामात धानाची शेती केली जाते. मुळातच धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. धान शेती पावसावर अवलंबून आहे. मात्र, निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार धान शेती नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करीत असतात. दरम्यान, असाच प्रयोग करीत गोंदिया जिल्ह्यातील गोरगाव तालुक्यातील सोनी येथील एका शेतकऱ्याने गवती चहाची लागवड केली आहे.
कैलास बिसेन असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यात प्रतिकूल भौगोलिक वातावरण असतानाही बिसेन यांनी चक्क गवती चहा आणि सिंट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. बिसेन यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते धान पीक घेतात. धान पीक घेण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्याने व खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किमती यामुळे धानाची शेती परवडत नसल्याने त्यांनी एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिंट्रोनिला वनस्पतीची लागवड केली. हा वेगळा प्रयोग त्यांनी आपल्या मेहनतीने यशस्वी करून दाखविला आहे. भविष्यात जवळपास ५ ते ७ एकर क्षेत्रात ही लागवड करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तर या माध्यमातून लाखो रुपये वर्षातून नफा मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग करून विकास साधावा, असे बिसेन यांनी ‘लाेकमत’शी बोलताना सांगितले.
बहुगुणी वनस्पती
गवती चहा तीन महिन्यांत कापण्यावर येतो, असे बिसेन यांनी सांगितले. या वनस्पतीपासून तेल तयार होते. याचे शरीराला आणि आरोग्याला भरपूर फायदे आहेत. याचा वापर औषध, परफ्युम, सौंदर्य प्रसाधने आणि डिटर्जंट यामध्ये प्रामुख्याने केला जातो. डास पळविण्यासाठी सिंट्रोनिलाचे लोशन तर डोकेदुखीचे औषध व सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी लेमन ग्रासला मागणी आहे. कमीतकमी गुंतवणूक करून जास्त नफा यातून मिळू शकतो.
एक लिटर सिंट्रोनिला तेलाला ७०० रुपयांचा दर
एक लिटर सिंट्रोनिला तेलाला ७०० ते ८०० रुपये तर गवती चहाच्या तेलाला १२०० ते १५०० रुपये लिटर भाव मिळतो. यातून त्यांना एकरी एक लाख ते सव्वा लाख रुपये नफा मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. भविष्यात पाच ते सात एकर क्षेत्रावर ही लागवड वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. पारंपरिक पिकापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणारा बिसेन यांचा हा प्रयोग गावशिवारात कौतुकाचा विषय ठरला आहे.