लोणीटोला (सोनी) येथील प्रयोग : १२ हेक्टर परिसरात ३०० डिप सीसीटी नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सन २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात हरितक्रांती आणण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून ग्रामीण भागात आमूलाग्र प्रगती होत आहे. जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील लोणीटोला (सोनी) येथे तयार करण्यात आलेल्या सलग समतल चर (डीप सीसीटी) मुळे येथील खडकाळ जमीनीवर हरितक्रांती आली आहे. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकाळ जमीन उतार भागावर असल्याने पाण्याचा संचय त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे ही जमीन माळरान होती. परंतु सलग समतल चर (डीप सीसीटी) लावल्याने पाण्याची सोय झाली. परिणामी या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी राहीला. वन विभागाचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र शेंडे, गोरेगावचे वन परिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव व इतर अधिकाकाऱ्यांनी डीप सीटीटी चे काम १८ ठिकाणी केले आहे. २० मीटर लांब,एक मीटर खोल, एक मीटर रूंद डीप सीसीटीमुळे वाहून जाणारे पाणी जमा होणार आहे. यामुळे पाणी जमीनीत मुरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. या परिसरात झाडे लावली जात असल्याने या माळरानावर निसर्ग सौंदर्य फुलेल. एकट्या लोणीटोला येथे १२ हेक्टर वन जमीनीवर ३०० डीप सीसीटी लावले आहेत. हेक्टर मागे २४० मीटर डिप सीसीटी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी (नरेगा) आर.टी.शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोरेगावचे खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यासंदर्भात उतार भागातील परिसरात पाणी व माती अडविण्यासाठी डीप सीसीटी पासून १८ गावातील भूजलस्तरात वाढ होईल असे वनविभागाचे म्हणणे आहे. वन विभागाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दर हेक्टर २४० मीटर मध्ये डीप सीसीटी तयार करण्यात आली. डीप सीसीटीसाठी वनविभागाने ३ लाख ९३ हजार ६२९ रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले. यात ३ लाख ३ हजार ३८३ रूपये मजूरीवर खर्च करण्यात आले.
खडकाळ रानावर फुलणार हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:18 AM