नरेश रहिले
गोंदिया : निराधार, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व वृद्धांना निराधार योजनेचा लाभ देण्यात येतो; परंतु अनेकांना अर्ज कसे करावे, काय कागदपत्र जोडावे याची कल्पना नसल्याने त्यांचा गैरफायदा समाजातील काही दलाल घेत होते. या दलालांकडून गोरगरिबांचे आर्थिक शोषण होत होते. या शोषणावर कायमस्वरूपी रामबाण उपाय म्हणून गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यातील निराधारांसाठी ‘गृहभेट आपुलकी’ची हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातून गोंदिया जिल्ह्यातील गरजवंत २ हजार गोरगरिबांना निराधार योजनेचा लाभ सुरू झाला आहे.
ग्रामीण भागातील अनेक लोक संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेपासून वंचित आहे. अनेकांना या लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसे करावे याची माहिती नसते. हे अर्ज करणे त्यांच्या समोर मोठे आवाहन असल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाची पायरीही गाठली नाही. या गोरगरीबांना काही दलाल पैसे मिळवून देण्याचे आमिष देऊन आधी त्यांची लुबाडणूकही करत होते. त्या गरजूंची लुबाडणूक होऊ नये, त्यांना लाभ मिळावा यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्यामार्फत‘गृहभेट आपुलकीची’ हा उपक्रम राबविण्यास सुरूवात करण्यात आली. या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांपासून अलिप्त असलेल्या २ हजार लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ‘गृहभेट आपुलकीची’ या उपक्रमातून लाभार्थ्यांच्या घरीच जाऊन शासनाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अर्ज भरून त्यांना लाभ मिळवून दिला आहे.
बॉक्स
देवरी तालुका आघाडीवर
जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी गावात गेले तर त्यांना अशा गरजूंना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत निराधार असलेल्या २ हजार लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यात देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ८०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याने ४५० लाभार्थी शोधून त्यांना लाभ दिला आहे. गोंदिया तालुक्याने १५०, तर आमगाव, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोरेगाव व तिरोडा या तालुक्यांनी प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ दिला आहे.
...
कोट
गरजूंना त्यांच्या हक्काची योजना मिळावी, त्यांना योजनेचा लाभ कसे घेतात हे देखील माहीत नव्हते. त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील २ हजार निराधारांना या योजनेचा लाभ जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून देण्यात आला आहे.
-राजेश खवले,अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया.