सहषराम कोरोटे : आदिवासी हलबा-हलबी सामूहिक विवाह समारंभ लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सामूहिक विवाह पद्धत ही काळाची गरज झालेली आहे. या विवाह पद्धतीमुळे वेळ व पैशाची मोठी बचत होते. त्याचबरोबर समाजात एकोपा व सलोखा निर्माण होऊन एका संघटित समाजाची उभारणी होते. त्यामुळे आज सामूहिक विवाह सोहळा सामाजिक सुदृढतेला पोषक ठरत आहे, असे प्रतिपादन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले. ते हलबीटोला (सालेकसा) येथे आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी समाजबांधवासह उपस्थित सर्व लोकांसमोर विचार व्यक्त करीत होते. सर्वच समाजातील शिक्षिक व समजदार लोकांनी सामूहिक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनसुद्धा कोरोटे यांनी केले. हलबीटोला (सालेकसा) येथील सामूहिक विवाह सोहळ्यात आदिवासी हलबा-हलबी समाजाचे एकूण आठ जोडपे विवाह बंधनात बांधले गेले असून सामाजिक प्रथा परंपरेनुसार त्यांचे शुभ मंगल कार्यक्रम पार पडले. उद्घाटन आमगाव-देवीरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते, डॉ.एन.डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यत आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून आदिवासी नेते सहषराम कोरोटे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, माजी आ. रामरतन राऊत, जि.प. सदस्य लता दोनोडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, माजी जि.प. सदस्य रामाजी गावराने, भाजप अध्यक्ष परसराम फुंडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोहन क्षीरसागर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष शंकर मडावी, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, सेवानिवृत्त पशुधन अधिकारी डॉ. विठ्ठल भोयर, समाजाचे सचिव अजय कोटेवार यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मंडळी आणि समाजबांधव वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात सहषराम कोरोटे पुढे म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींचे लग्न केल्याने खर्चाची मोठी बचत होते. त्या पैशाचा उपयोग मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी केला तर समाजाची व कुटुंबाची प्रगती घडवून येईल. कुटुंब प्रगत झाल्यातर समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व समितीद्वारे करण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला. संचालन राजेश भोयर यांनी केले. आभार राजू राऊत यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिला. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी किशोर गावराने, राजेश प्रधान, जे.आर. गावराने, श्रीराम भोयर, प्रमोद राऊत, देवचंद चौधरी, यू.जी. पिसदे, हेमराज राऊत, खेमराज घरत, आर.एल. राणे, मोहन प्रधान, संजय भोयर, अशोक गावराने, अनिल कुमडे, तसेच आदिवासी हलबा-हलबी कर्मचारी संघटनेने सहकार्य केले.
सामूहिक सोहळे समाजाला पोषक
By admin | Published: May 12, 2017 1:18 AM