हीना कावरे यांचे प्रतिपादन : अमृतलाल माहेश्वरी स्मृती समारोह आमगाव : स्वत:चा विकास घडविण्यासाठी नेहमी चांगल्या विचारांचा अंगिकार करुन विचारांची कक्षा वाढवावी, असे मत किरनापूर-लांजी क्षेत्राच्या आमदार लीना कावरे यांनी व्यक्त केले. अमृतलाल माहेश्वरी स्मृती दिवस समारोहात अध्यक्ष स्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचे प्राचार्य डॉ. अजय केवलिया, डी.बी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू, भवभूती महाविद्यालय आमगावचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, लखनसिंह कटरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, एस.अमृतलाल माहेश्वरी स्व.द्वाराकादास फाफट, स्व.शिवरतन कोठारी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, सचिव रघुविरसिंह सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छाने स्वागत केले. याप्रसंगी डॉ. अजय केवलीया यांनी विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण न घेता सर्वांगिण विकासाकरिता प्रयत्नशील रहावे व नेहमी सकारात्मक विचार सरणी बाळगून वेळेचे नियोजन करावे असे विचार व्यक्त केले. डॉ. अंजन नायडू यांनी फक्त विषय वाचून पाठांतर न करता समजण्यावर भर द्यावा असे सांगितले. डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी स्व. अमृतलाल माहेश्वरी यांची शिकवण, औद्योगिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील आस्था, तळमळ व कामगिरी विषद करुन ते या क्षेत्राचे आधास्तंभ होते असे उदगार काढले. प्रस्तावना संस्थेचे सचिव रठुवरसिंह सूर्यवंशी, संचालन प्राचार्य कमलबापू बहेकार तर आभार प्रा.आर.डी. नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, नरेशकुमार माहेश्वरी, प्राचार्य अजय पालीवाल, जि.प. सदस्य सुकराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, बाळाप्रसाद दुबे, संतोष पुंडकर, डॉ. बुलाखीदास कलंगी, शिवचरण शिंगाडे उपस्थित होते. यशस्वितेसाठी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विकासासाठी स्वत:च्या विचारांची कक्षा वाढवा
By admin | Published: February 11, 2017 1:23 AM